Monday, September 04, 2006

बापरे! किती काय काय करायचय?

जवळ जवळ दोन महिने झाले असतील काहि लिहले नाही. बरेच दिवस झाले लिहिन लिहिन म्हणत होतो पण राहिलच. तसा तीन-चारदा लिहायचा प्रयत्न केला आणि अर्धवट काहीतरी लिहलही पण आवडले नाहीत म्हणून ते लेख पूर्णच केले नाहीत.
मी तसा आरामात काम करणारा आणि आरामात असूनही व्यवस्थित काम करणारा, पण गेल्या वर्षापासून किंवा विशेषत: गेल्या काही महिन्यांपासून इतक काय काय करायचय की वेळच पुरत नाहीय. माझ्या कार्यालयातल्या काम आणि जबाबदार्‍या वाढत चालल्यात आणि मी त्या कामामुळे माझ्या जीवनातला इतर वेळ वापरायला अजिबात तयार नाहीय. Balanaced life का काय ते म्हणतात ना तस काहीतरी हवय मला. मला अस कधीच वाटल नव्हत की मी देवाकडे दिवसात जास्त वेळ असावा अस कधी मागेन, पण आता अस वाटतय की एका दिवसात चोवीस नव्हे तर कमीत कमी छ्त्तीस तास तरी असावेत. अर्थात कार्यालय मात्र आठच तासाच असाव. किती काय काय करायच आहे; कार्यालयाच्या कामात (सध्या ते माझ्या आवडीच आहे म्हणून) स्वत:ला झोकुन द्यायच आहे आणि अस काहितरी करायचा आहे की ज्यामुळे पूर्ण जगात माझ नाव होईल; वाचायची आहेत अशा पुस्तकांची यादी तयार झालीय आणि ती वाढतच चाललीय, ती सगळी पुस्तके वाचायची आहेत; रोज घरच्यांबरोबर मनसोक्तपणे गप्पा मारायच्यायत आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवायचाय; रोजच्या रोज मला माझे विचार आणि माझे अनुभव लिहायचेयत; दूरच्या मित्रांशी सतत contact मध्ये रहायचय आणि जवळच्या मित्रांबरोबर बाहेर मस्त हुंदडायचय; मला प्रेम अनुभवायचय; माझी ज्ञानाची भूक मिटवायचीय आणि जितक ज्ञान जमा करता येईल तितक ज्ञान घ्यायचय आणि सर्वात शेवटी आणि महत्वाच म्हणजे मधून मधून या माणसांनी बनवलेल्या concrete च्या जंगलापासून दूर कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी जाउन निसर्ग अनुभवायचाय आणि ताजी हवा खायचीय. मला माहीत नाही हे एवढ सगळ मी कस करणार आहे, मला अगदी पुसटशीही कल्पना नाही पण करायच एवढ मात्र नक्की. माझी अशी खात्री की वरच्या यादीत नक्कीच काही गोष्टी राहुन गेल्यायत, पण जाउदेत आता.
नेहमीप्रमाणे याहि लेखाचा शेवट एका मूर्ख प्रश्नाने करतो. जर या यादीतल्या सगळ्या गोष्टी मी करु शकलो तर माझ्या उर्वरीत आयुष्यात या गोष्टी करत राहण्यात मला मजा येईल का? हे असच सर्व करत रहावस वाटेल का, की माझ्या आवडीनिवडी बदलत राहतील?