Thursday, April 03, 2008

बरेच दिवस तीची आणि माझी गाठभेट झाली नव्हती. तीचे आणि माझे नाते तसे थोडे वेगळेच आणि एकतर्फी. मला तीचे नावगाव काही म्हणजे काही माहिती नाही आणि माझी खात्री आहे की तीलाही माझ्याबद्दल काहीच माहित नाही. एकाच रस्त्यावर चालत असतांना एकमेकांच्या समोरुन जाणे, ही आमची भेटीची तर्‍हा. अर्थात असे बर्‍याच लोकांबरोबर होत असावे, मग यात विशेष असे ते काय? विशेष म्हणजे तीचे ते 'Hi' म्हणतांनाचे गोड हसणे. माझ्या मनात तो हसरा चेहरा बर्‍याच वेळा येत असतो. आज अचानक फेरी मारायला जात असतांना चुकुन नेहमी जातो त्याचा विरुद्ध दिशेने चालायला लागलो आणि ती समोरुन येउन नेहमीप्रमाणे गोड हसत 'Hi' म्हणून गेली. माझ्या वाईट जात असलेल्या दिवसाचे सार्थक झाले. अचानक माझा moodही चांगला झाला. तीच्या मनात काही नसेल, माझ्या मनातही काही नाही, पण तीचा तो हसरा चेहरा बघितला की मन कस आनंदी होत. देव करो मी जो पर्यन्त मी इकडे आहे, ती अशीच मला दिसत रहावी आणि हसत रहावी.

Monday, February 04, 2008

स्वप्नांच्या विश्वात

मुंबापुरीतल्या एका शांत ठिकाणी घर आहे माझ. (छ्या! स्वप्नातपण शहर सोडवत नाही, काय होणार रे देवा माझ?). मुंबापुरीत शांत ठीकाण म्हणजे अशक्यच, पण स्वप्न आहे त्यामुळे सगळ माफ. तर अशा या शांत ठीकाणी एक छानसा बंगला, बंगला नाही इमारत म्हणा ज्यात मी, माझी बायको (हे म्हणजे अति झाल, एक पोरगी वळुन बघत नाही, आणि बायको म्हणे. चुप रे! बघु दे मला माझ स्वप्न). हा तर या इमारतीत मी, माझी बायको, माझे आणि तीचे आईवडील आणि भावंड असे सगळे राहतात कींवा राहु शकतो. (च्यायला! हे कसल स्वप्न, हे तर nightmare. असु दे, असु दे. आणि मी म्हणालो की सगळे राहु शकतात. मी, माझी बायको राहणार; हा आणि माझे आईवडील, बाकी सगळे राहु शकतात, जरुरी नाही.). जुन्या काळात एका कुटुंबाचा वाडा असायचा तस, पण modern पद्धतीचा, स्वतंत्र घरे असलेला. घरात भरभराट, सुख नांदतय. मी आणि माझ्या बायकोच एकमेकांवर अतिशय प्रेम आहे (बायको आहे आणि प्रेम नाही तर सुख कुठुन मिळणार?). दोघांचही स्वतंत्र असे career आहे. मी एक freelance consultant, एका कंपनी पार्टनर आणि process consulting नावाच्या एका अगम्य विषयावर पुस्तक लिहलेला असा लेखक आहे. (अरे! अरे! स्व्प्न असल म्हणुन काय झाले, काही मर्यादा आहेत की नाही? नाही, काही मर्यादा नाहीत) तीही तिच्या आवडत्या विषयातच काम करते. एकंदरीत दोघही आपापल्या कामावर खुश आहेत. घरात भरभराट म्हणजे सर्व काही आहे, वाहन आहेत, रोजच्या वापराला लागणार्‍या सर्व सुखसोयी आहेत आणि गरज लागली तर पैस्याची काही कमी नाही.
मुंबापुरीतल्या घराशिवाय अजुन तीन-चार तासाच्या अंतरावर एका चिमुकल्या गावात एक चिमुकला बंगला आहे. बंगल्याच्यासमोरुन निसर्गरम्य देखावा दिसतो. समोर एक दरी आणि त्या दरीतूनच उभे राहणारे उंच डोंगर, त्यातून वाहणारे छोटे छोटे झरे. कदाचित खंडाळा, लोणावळ्याच्या जवळपास कुठेतरी असेल हे गाव. प्रत्येक आठवड्याअखेरीला कींवा महिन्यातून एकदा तिकडे जाव, निसर्गाच्या आणि गावाच्या शांततेत स्वतःच मनही शांत करुन घ्याव. त्यात मधुन मधुन त्या डोंगरांमध्ये trekkingलाही जाव. (काय रे हे!, परत एकदा शाळेत जाउन मराठी शिक.) माझी आणि सगळ्या गाववाल्यांची मैत्री आहे. आम्ही गावातल्या सोहळ्यांत शक्य तितका भाग घेतो आणि गावातल्या मुलामुलींना त्याचे भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शनही करतो.
एवढ्यासगळ्यात मी वेळात वेळ काढुन मी स्वतःशी बोलत राहतो, एकटा राहण्यात जो आनंद असतो तोही अनुभवतो. एक स्व्प्न पूर्ण झाल्यावर नवीन स्व्प्न मनात रमवत राहतो आणि ते स्वप्न पूर्ण करायच सामर्थ्य बाळगून जीवन जागत राहतो.

हे होत माझ एक छोटस (अह! अह!) स्वप्न आजपासून चार-पाच वर्षांपर्यंत, नाही नाही लवकरात लवकर पूर्ण व्हाव अस. फक्त ते स्व्प्न पूर्ण करायच सामर्थ्य अंगात आणून काम करायच आहे. स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, मी ते पूर्ण करणारच. :)

Sunday, January 27, 2008

विसरलो मी मला,
शोधू कुठे मी मला,
होतो मी सदैव हसरा, आयुष्याची लढाई नेटाने लढणारा. कधी खिन्न होउन तर कधी आनंदाने, पण नेहमीच सुंदर स्वप्ने बाळगणारा, स्वप्ने कधी ना कधी खरी होतील अशी वेडी आशा बाळगणारा. आत्मविश्वासाची कधीच काही कमी नव्हती, फक्त संधी मिळायची वाट होती. स्वत:चेच नाही तर दुसर्‍यांचेही आयुष्य सुखी करायची इच्छा होती. संधी आली, वाटले की आपणही का इतरांप्रमाणे त्याच त्याच रगाड्यात फसावे, तडजोड कशी ती जमलीच नाही. पण प्रत्येक गोष्टीची कींमत असते, इतरांशी लढुन लढुन दमछाक झाली. सुंदर स्वप्ने बघणारे मन दिवसाढवळ्या वाईट स्वप्नांचा शिखर चढू लागले. सुंदर स्वप्न आलेच तर त्याची परीस्थितीशी तुलना करुन त्याची खिल्ली उडवायला लागले. नेहमीच वाट ठाउक असलेला मी, हरवून गेलो. भव्य सागराच्या मध्यभागी उभेच राहता येइल इतक्या छोट्या बेटावर अडकुन पडलो. स्वत:च्याय प्रश्नांचा विचार करण्यात इतका गुंतून गेलो की दुसर्‍यांचेही आयुष्य सुखी करायची जबाबदारी आपण घेतली होती हे विसरुन गेलो. आताही मी हसतो, पण त्या हसण्यात क्वचितच आनंद असतो. आता मी सदैवच खिन्न असतो, पण आजही मधून मधून त्या भव्य सागरात पोहुन जमीनीवर जाण्याची योजना करु लागतो. माझ्या मनाशी मी एवढेच मागतो की काही झाले तरी ही आशा मात्र सोडू नको.
आज परत आयुष्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, तडजोड करावी की नाही अशा संभ्रमात पडलेला.

Wednesday, January 16, 2008

पारंपरिक मराठी संगीत आणि कविता

आज सहजच मनात विचार आला कि आपल्यात पारंपरिक मराठी संगीताचे प्रकार कोणते आहेत?
  • पोवाडा
  • भारुड
  • गोंधळ
  • लावणी
  • कीर्तन (माफ करा जर हे संगीतात मोडता येत नसेल तर, ते म्हणायची एक विशिष्ट पद्धत असते म्हणून)
अजुन मला काही आठवत नाही, तुम्हाला माहीत आहे का?

याचप्रमाणे कविता लिहण्यात 'ओवी' हा प्रकार आहे (ज्ञानेश्वरी ओवींमध्ये लिहली असल्यामुळे माहीत); असे कवितांचे मराठीमध्ये अजुन प्रकार आहेत का?