Monday, October 11, 2010

लढून लढून थकलो आणि थकून थकून लढतोय.कशाशी लढतोय? माहित नाही, बहुतेक आयुष्यातल्या प्रत्येक पैलुतल्या अडथळा बनणाऱ्या लोकांशी. लढायचे असते ते परिस्थितीशी, लोकांशी नाही; या माझ्याच तत्वज्ञानाशी कुठेतरी विसंगत. कुठेतरी स्वतःलाच हरवून बसलोय. गाढ झोपेत रमणीय स्वप्न बघत असताना कुणीतरी गटारातले पाणी तोंडावर मारून उठवावे, तशी काहीशी हि अवस्था आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मला काय करायचे आहे, त्यापेक्षा वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांना न दुखावता आणि त्यांनाहि जे हवे असे काहीतरी काम कसे शोधायचे ह्याचा जास्त विचार करावा लागत आहे. का? तर या लोकांच्या हातात माझे भविष्य आहे. कुणी दिला ह्यांना तो अधिकार? मीच, कारण मी त्यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. मी तो निर्णय का बदलत नाही? कारण तो बदलायचा तर परत सगळी नव्याने सुरवात करावी लागेल, आणि ती करायची मला अजूनतरी हिंमत होत नाहीय. आपण अशी निरर्थक बंधन स्वतःवर का लादून घेतो? माझा स्वभाव हा corporate culture शी कधीच जुळणार नाही हे माहित असूनही मी का या corporate चक्रात अडकलोय? अभिमन्यूसारखा या चक्रव्युव्हातच माझा अंत तर होणार नाही न? खरतर या चक्रव्युव्हातून बाहेर पडलो तर करायचे काय हेच मला माहित नाहीय, त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्नही करत नाहीय. असो, काहीतरी तर मार्ग शोधूच.
चार-पाच महिन्यातून एकदा असे काहीबाही लिहिण्यापेक्षा नियमितपणे काहीतरी चांगले लिहले पाहिजे. निदान स्वतःच्या डोक्यातून कुठली कल्पना निघत नसेल, दुसऱ्यांनी काही चागले काम केले असेल तर ते तरी लिहावे.
ता.क.: Boss या शब्दाला योग्य असा मराठी प्रतिशब्द कुठला? साहेब आणि मालक, हे दोन्ही शब्द बरोबर वाटत नाही. मालक हा शब्द अगदीच दास परंपरेतला वाटतो, तर साहेब हा शब्द आपण कोणीही वरच्या जागेवर असलेल्या व्यक्तीला वापरतो.

Thursday, August 12, 2010

आज भलताच कंटाळा आलाय. डोक्यावरती इतकी कामे असूनही असे वाटतंय कि जणू काही मला काही कामच नाहीय. खर म्हणजे मी आता जितक्या गोष्टींची जबाबदारी माझ्या डोक्यावर घेतलीय, तो एक मूर्खपणाच आहे. त्यातच माझ्या पूर्वीच्या कार्यालयाच्या आठवणी आल्या, आणि तिकडच्या सहकाऱ्यांबरोबर काम करतांना किती मजा यायची ते हि आठवले. अत्यंत चांगला boss असला कि किती फरक पडतो ते आता कळले. मी फारच नशीबवान होतो त्या समूहात काम करायला. फारच कवचित असे होते, कि तुम्हाला एकाच समुदायात एवढी सगळी चांगली लोक भेटतात. शेवटी एका पूर्वीच्या सहकाऱ्याबरोबर कार्यालयाचा messenger वापरून बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. दिवस थोडासा कामी लागल्यासारखा वाटला. नाहीतर तेच रद्दड routine.
अस वाटते कि कुठेतरी आपण काहीतरी चुकतोय पण बरोबर काय तेच कळत नाही. कधीतरी बरोबर काय ते कळूनही ते करायची हिंमत अंगात येत नाही. पण मी हे काय बोलतोय? मला वाटते मी नेहमी प्रमाणे भरकटलो, असुद्या चालायचच.

Tuesday, March 16, 2010

कविता नसलेली कविता

कधी कसे काही सुचेना, माझ्या मनात काहीच राहीना.
कोणी म्हणते हे कर, कोणी म्हणते ते कर.
मी करतो जे, ते कुणा चालेना, पण ते केल्याशिवाय मला काही करमेना.
कोण चूक, कोण बरोबर, कोण चूक, कोण बरोबर, मला काही माहित नाही.
मी वेडा कि जग वेडे, तेही काही कळत नाही.
शहाण्यांच्या या जगात, मज वेड्याची हि काय गत?
जाऊदे, म्हंटले मी स्वतःला, कोणाला काय फरक पडतो?
मी माझ्या आयुष्याची दोरी पकडून, लटकत राहायचे कुठल्यातरी खांबाला.
नाही जमत आपल्याला बैलासारखी मान डोलवून वरिष्ठांचे ऐकणे,
नाही जमत आपल्याला मूर्ख रुढींच्या आहारी जाणे,
नाही जमत आपल्याला नसलेल्या देवाच्या शरण जाणे,
नाही जमत आपल्याला पैसे कसे invest करावे,
नाही जमत आपल्याला पोरीला कसे impress करावे,
नाही जमत आपल्याला माहित असलेल्या गोष्टींचा दिखावा करणे,
नाही जमत आपल्याला चांगलेपणाचा दिखावा करणे,
नाही जमत आपल्याला चेहऱ्यावर खोटे भाव दाखवणे,
नाही जमत आपल्याला दिवसभर नावडते काम करून, यशस्वी होण्याचा दावा करणे,
आपण पडलो सरळसोट, दुधाला म्हणालो दुध, पाण्याला म्हणालो पाणी,
कुणी म्हणाले तू गाढव, तर नाही रेकलो आम्ही,
कुणी म्हणाले तू शहाणा, नाही पडलो पाया त्याच्या.
लाज नाही वाटली कधी या सरळपणाची,
लाज नाही वाटली कधी प्रामाणिकपणाची
तरी मनात सल राहते, तरी मनात सल राहते, का आलो या जगावरती,
काय कार्य करिता होईल शाश्वती या वेड्या मनाची,
असेच वेडे वेडे म्हणता का सरून जाणार जीवन?
जरी या शहाण्यांच्या जगात वेडेच बनती महान,
मी कुठला वेडा, महानवाला कि वेडाच राहणारा?