Monday, October 11, 2010

लढून लढून थकलो आणि थकून थकून लढतोय.कशाशी लढतोय? माहित नाही, बहुतेक आयुष्यातल्या प्रत्येक पैलुतल्या अडथळा बनणाऱ्या लोकांशी. लढायचे असते ते परिस्थितीशी, लोकांशी नाही; या माझ्याच तत्वज्ञानाशी कुठेतरी विसंगत. कुठेतरी स्वतःलाच हरवून बसलोय. गाढ झोपेत रमणीय स्वप्न बघत असताना कुणीतरी गटारातले पाणी तोंडावर मारून उठवावे, तशी काहीशी हि अवस्था आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मला काय करायचे आहे, त्यापेक्षा वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांना न दुखावता आणि त्यांनाहि जे हवे असे काहीतरी काम कसे शोधायचे ह्याचा जास्त विचार करावा लागत आहे. का? तर या लोकांच्या हातात माझे भविष्य आहे. कुणी दिला ह्यांना तो अधिकार? मीच, कारण मी त्यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. मी तो निर्णय का बदलत नाही? कारण तो बदलायचा तर परत सगळी नव्याने सुरवात करावी लागेल, आणि ती करायची मला अजूनतरी हिंमत होत नाहीय. आपण अशी निरर्थक बंधन स्वतःवर का लादून घेतो? माझा स्वभाव हा corporate culture शी कधीच जुळणार नाही हे माहित असूनही मी का या corporate चक्रात अडकलोय? अभिमन्यूसारखा या चक्रव्युव्हातच माझा अंत तर होणार नाही न? खरतर या चक्रव्युव्हातून बाहेर पडलो तर करायचे काय हेच मला माहित नाहीय, त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्नही करत नाहीय. असो, काहीतरी तर मार्ग शोधूच.
चार-पाच महिन्यातून एकदा असे काहीबाही लिहिण्यापेक्षा नियमितपणे काहीतरी चांगले लिहले पाहिजे. निदान स्वतःच्या डोक्यातून कुठली कल्पना निघत नसेल, दुसऱ्यांनी काही चागले काम केले असेल तर ते तरी लिहावे.
ता.क.: Boss या शब्दाला योग्य असा मराठी प्रतिशब्द कुठला? साहेब आणि मालक, हे दोन्ही शब्द बरोबर वाटत नाही. मालक हा शब्द अगदीच दास परंपरेतला वाटतो, तर साहेब हा शब्द आपण कोणीही वरच्या जागेवर असलेल्या व्यक्तीला वापरतो.