Monday, February 04, 2008

स्वप्नांच्या विश्वात

मुंबापुरीतल्या एका शांत ठिकाणी घर आहे माझ. (छ्या! स्वप्नातपण शहर सोडवत नाही, काय होणार रे देवा माझ?). मुंबापुरीत शांत ठीकाण म्हणजे अशक्यच, पण स्वप्न आहे त्यामुळे सगळ माफ. तर अशा या शांत ठीकाणी एक छानसा बंगला, बंगला नाही इमारत म्हणा ज्यात मी, माझी बायको (हे म्हणजे अति झाल, एक पोरगी वळुन बघत नाही, आणि बायको म्हणे. चुप रे! बघु दे मला माझ स्वप्न). हा तर या इमारतीत मी, माझी बायको, माझे आणि तीचे आईवडील आणि भावंड असे सगळे राहतात कींवा राहु शकतो. (च्यायला! हे कसल स्वप्न, हे तर nightmare. असु दे, असु दे. आणि मी म्हणालो की सगळे राहु शकतात. मी, माझी बायको राहणार; हा आणि माझे आईवडील, बाकी सगळे राहु शकतात, जरुरी नाही.). जुन्या काळात एका कुटुंबाचा वाडा असायचा तस, पण modern पद्धतीचा, स्वतंत्र घरे असलेला. घरात भरभराट, सुख नांदतय. मी आणि माझ्या बायकोच एकमेकांवर अतिशय प्रेम आहे (बायको आहे आणि प्रेम नाही तर सुख कुठुन मिळणार?). दोघांचही स्वतंत्र असे career आहे. मी एक freelance consultant, एका कंपनी पार्टनर आणि process consulting नावाच्या एका अगम्य विषयावर पुस्तक लिहलेला असा लेखक आहे. (अरे! अरे! स्व्प्न असल म्हणुन काय झाले, काही मर्यादा आहेत की नाही? नाही, काही मर्यादा नाहीत) तीही तिच्या आवडत्या विषयातच काम करते. एकंदरीत दोघही आपापल्या कामावर खुश आहेत. घरात भरभराट म्हणजे सर्व काही आहे, वाहन आहेत, रोजच्या वापराला लागणार्‍या सर्व सुखसोयी आहेत आणि गरज लागली तर पैस्याची काही कमी नाही.
मुंबापुरीतल्या घराशिवाय अजुन तीन-चार तासाच्या अंतरावर एका चिमुकल्या गावात एक चिमुकला बंगला आहे. बंगल्याच्यासमोरुन निसर्गरम्य देखावा दिसतो. समोर एक दरी आणि त्या दरीतूनच उभे राहणारे उंच डोंगर, त्यातून वाहणारे छोटे छोटे झरे. कदाचित खंडाळा, लोणावळ्याच्या जवळपास कुठेतरी असेल हे गाव. प्रत्येक आठवड्याअखेरीला कींवा महिन्यातून एकदा तिकडे जाव, निसर्गाच्या आणि गावाच्या शांततेत स्वतःच मनही शांत करुन घ्याव. त्यात मधुन मधुन त्या डोंगरांमध्ये trekkingलाही जाव. (काय रे हे!, परत एकदा शाळेत जाउन मराठी शिक.) माझी आणि सगळ्या गाववाल्यांची मैत्री आहे. आम्ही गावातल्या सोहळ्यांत शक्य तितका भाग घेतो आणि गावातल्या मुलामुलींना त्याचे भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शनही करतो.
एवढ्यासगळ्यात मी वेळात वेळ काढुन मी स्वतःशी बोलत राहतो, एकटा राहण्यात जो आनंद असतो तोही अनुभवतो. एक स्व्प्न पूर्ण झाल्यावर नवीन स्व्प्न मनात रमवत राहतो आणि ते स्वप्न पूर्ण करायच सामर्थ्य बाळगून जीवन जागत राहतो.

हे होत माझ एक छोटस (अह! अह!) स्वप्न आजपासून चार-पाच वर्षांपर्यंत, नाही नाही लवकरात लवकर पूर्ण व्हाव अस. फक्त ते स्व्प्न पूर्ण करायच सामर्थ्य अंगात आणून काम करायच आहे. स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, मी ते पूर्ण करणारच. :)

No comments: