Friday, May 26, 2006

लग्नांचा हंगाम

लग्नांचा हंगाम तसा दरवर्षीच येतो, पण या वर्षीचा हंगाम माझ्याकरता जरा वेगळाच कारण अचानक या वर्षीच्या हंगामात बराचसा माझा मित्रपरीवार लग्नाच्या सुंदर (?) बेडीत अडकणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच एका मित्राच्या लग्नाला हजेरी देउन आलो, त्याचवेळी एकाचा साखरपुडा झाला; एकाचा दोन दिवसाने साखरपुडा आहे, आणि एक घरी मुलगी बघायला गेलाय. हा मुलगी किंवा मुलगा (जरी या प्रकाराला मुलगी बघणे म्हणत असले तरी मुली काही आंधळ्या नसतात, त्यांचाही तेवढाच अधिकार असतोच) बघायचा प्रकार जरा गंमतशीरच वाटतो, अर्थात अजून माझ्यावर वेळ आली नाहीय म्हणून; जेव्हा माझ्यावर वेळ येईल तेव्हा माझी काय अवस्था होईल याची मला कल्पनाही करवत नाही. लग्नाची चिंता आईवडीलांपेक्षा आजूबाजूच्या नातेवाईकांनाच जास्त असते. एकदा मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयाचे झाले की मग आयुष्यात पहिले कधीही न बोललेले नातेवाईक सुद्धा विचारतात, “मग काय, कधी करणार लग्न; अरे ती ह्या अमुक अमुकची मुलगी आहे ना, ती तमुक तमुक ठीकाणी नोकरी करते, दिसायला सुंदर आहे हो.” वगैरे वगैरे. नाही म्हंटल की काही आचरट नातेवाईक असेहीचारतात, “का? कोणी आहे वाटत?”. काहि नवीन जमान्याचे नातेवाईक असतात, ते लग्नाबद्दल नाहि विचारत, ते विचारतात, “काय? मग कुणी मुलगी शोधली कि नाही?” (जस काही बराचशा मुली मी propose मारायचीच वाट बघत असतात). मग माझ्यासारखे पामर ज्यांच्याकडे सहसा मुली ढुंकुनसुद्धा बघत नाहित ते बोलणार तरी काय; मग मी वाक्य टाकतो, “नाही, शोधकार्य चालू आहे, I hope, सापडेलच लवकर.” (मी पण अस बोलतो जस काही माझी एखादी मूल्यवान वस्तू हरवलीय आणि मी ती शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय). यातला अजून एक प्रकार म्हणजे काही नातेवाईक indirectly सुरवात करतात, “काय, मग तिकडे एकटाच राहतोस का?, खाण्याचे हाल होत असतील नाही, लग्न का नाही करुन टाकत?”. च्यायला बायको म्हणजे काय स्वयंपाकीण बाई आहे, की चांगल खायला नसेल मिळत तर बायको आणा. या सर्वात मोठा कहर म्हणजे काही मुलही असाच विचार करतात. माझा एका जवळच्या मित्राबरोबर याबाबत एकदा वाद झाला, मी त्याला स्पष्ट विचारल “बाबारे, पहिल्यांदी नक्की ठरव की तुला cook पाहीजे की बायको?” शेवटी त्यानेसुद्धा त्याच्या बोलण्यातला फोलपणा मान्य केला. एकंदर लग्न म्हणजे फारच किचकट प्रकार असतो, पण म्हणतात ‘शादी का लड्डू जो खाये वो भी पछ्ताये, जो न खाये वो भी पछताये’. आम्हीपण हा लाडू कधीतरी खाउच.
असो, सध्यातरी माझ्यापुढे प्रश्न हा आहे, की एवढ्या सगळ्या लग्नांसाठी मी सुट्टी कशी काढू. सगळे अगदी जवळचे मित्र असल्यामुळे कोणाला नाही म्हणणे जवळ जवळ अशक्य आहे. माझ मित्रमंडळ म्हणजे नवीन नवरे आणि हो‍उ घातलेले नवरे अगदी खुशीत आहेत, ज्यांना नवीन जबाबदार्‍यांच tension आलय ते ही आनंदात आहेत.

Tuesday, May 16, 2006

विचारांच्या भ्रमंतीत

काहि लोक बोलून मग विचार करतात तर काहि विचार करतात आणि मग बोलतात. मी फार विचार करुन फार कमी बोलणार्‍या लोकांमधला. या सवयीचे जसे फायदे आहेत तसे तोटेहि भरपूर आहेत. कोणि काही अचानकपणे मला अनपेक्षित प्रश्‍न विचारला तर फारच गोची होते. मग अचानक मी हुशार निखील मधून मठ्ठ निखील मध्ये परीवर्तीत होतो. आज असाच एक प्रसंग झाला, मी माझ्या कार्यालयातील एका सहकारी बरोबर कार्यालयातील काही कामाबद्‍दल बोलत होतो आणि माझ्या संगणकावरील ब्लॉगरची window बघून तीने मी ब्लॉग लिहतो का अस विचारल. आता हा साधा, सरळ, सोप्पा प्रश्‍न, पण मी दोन मिनिट काहि बोलूच शकलो नाही; त्यानंतर हळूच हो म्हंटले. तीने प्रश्‍न विचारल्याबरोबर माझे विचार सुरु झाले, माझ्या इंग्रजी ब्लॉगवर मी माझ्या कार्यालयातील लोकांबद्‍दल बरच काही लिहलय, ते मी share करु शकतो का? मग मी कार्यालयाबद्‍दल काय काय लिहलय? वगैरे वगैरे. (ती अमराठी त्यामुळे तिच्याशी इंग्रजी ब्लॉगच share करावा लागणार.) एवढया सगळ्या विचारात तीने माझ्या ब्लॉगची link विचारली आणि मी काहि ती दिली नाही.
विचारांच्या भ्रमंतीत माझ्यासारखी माणस कधी हरवतात ते त्यांच त्यांनाच कळत नाही. मला कधी कधी फार अप्रूप वाटत की बाकी सगळे विचार आणि बोलण यांचा मेळ कसा साधतात. हि एक गोष्ट मला शिकायची आहे. विचारांची हि देवाने दिलेली देणगी मला लाभलीय खरी पण तिचा व्यवस्थितपणे वापर करावा हे मात्र पूर्णपणे उमगलेले नाही, आणि मलाच नाही तर बर्‍याच लोकांना ही गोष्ट उमगत नाही.

Thursday, May 11, 2006

माझ मराठी वाचन

दोन दिवसांपूर्वी मी सहजच मराठी ब्लॉगविश्वाला भेट दिली आणि माझ्या ब्लॉगचे नाव मराठी ब्लॉगश्रुंखलेत बघून एक सुखद धक्काच बसला. खरतर मी माझा ब्लॉग नोंदवण्यासाठि त्या संकेतस्थळाला भेट दिली होती. मला मराठी ब्लॉगविश्वाचे या तत्परतेकरता आभार मानायलाच हवेत. आता मलासुद्धा नियमितपणे ब्लॉग लिहित राहण्याचा निर्धार करायला हवा.
हा होता पहिला धक्का आणि आज परत संकेतस्थळाला भेट दिल्यावर दुसरा धक्का बसला, तो म्हणजे winiने मला दिलेला tag, ह्या धक्क्यातन सावरण थोड कठिणच आहे. तसा मी वाचनप्रिय मनुष्य पण गेल्या बर्‍याच वर्षात मराठी पुस्तकांशी काहि संबंध असा आलाच नाही, त्यामुळे फारच आठवून आठवून उत्तर द्‍यावी लागणार. एकदा ते दहावीपासून त्या दुष्ट अभ्यासाने आणि करीयरच्या tension ने जो पिच्छा पुरवला तो अगदी मागच्यावर्षीपर्यंत, अर्थात करीयरचे tension अजून आहेच. नोकरी करतोय ती पण महाराष्ट्राबाहेर, ते हि R&D वाली त्यामुळे कामाविषयी पुस्तके वाचण जास्त. इथे मराठी मित्रांचा अभाव आणि आजुबाजुचा प्रभाव ह्यामुळे इंग्रजी पुस्तके मात्र बरीच वाचली, इकदे खरतर मराठी बोलायला मिळ्णच भाग्यकारी.
आता नखरे सोडुन उत्तर द्‍यायला सुरवात करतो. (म्या पामराची काय अवस्था होतेय ते सांगण कठीण आहे, इतक्या वर्षांनंतर पुस्तकांची आणि त्यांच्या लेखकाची नाव आठवायची म्हण्जे, माझी अवस्था गल्लीतल्या पोराला ब्रेट ली ची बॉलिंग खेळायला लावल्यावर जशी व्हावी तशी होत आहे.)
१. सध्या वाचनात असलेले / शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
पार्टनर - व. पु. काळे

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
एका सामान्य माणसाचे जीवन आणि त्यात त्याच्या आयुष्य enjoy करणार्‍या roommate ची कहाणी. (यापेक्षा काही जास्त लिहायच तर मला माझ्या जवळ जवळ नसलेल्या memoryवर जरा जास्तच जोर द्‍यावा लागेल)

३. अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -
असा मी असा मी – पु. ल. देशपांडे
ती फुलराणी - पु. ल. देशपांडे
छावा – शिवाजी सावंत
श्रीमान योगी – रणजित देसाई
स्वामी – रणजित देसाई

४. अद्‍याप वाचायची आहेत अशी ५ मराठी पुस्तके -
युगंधर - शिवाजी सावंत
म्रुत्युंजय - शिवाजी सावंत
आचार्य अत्रे आणि रत्‍नाकर मतकरी यांची सर्व


५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
स्वामी - रणजित देसाई
माधवराव पेशवे यांच्यावर लहानपणातच पडलेली प्रचंड जबाबदारी आणि ऐन तारुण्यातच म्रुत्युची घरघर व त्यातच एवढी वर्षे इंग्रजाना दूर ठेवण्यात आलेल यश गमावून बसण्याची शक्यता; या सर्वांच उत्क्रुष्ट चित्रण म्हणजे हे पुस्तक. माधवराव पेशव्यांच धैर्य आणि शेवटी आपले काकाच आपले शत्रु बनत असल्याच दु:ख, अशा सर्व भावना रणजित देसाई यांनी अत्यंत सुंदरपणे आपल्या लेखनात उतरवल्यात.
Its inspirational to say the least.

Thursday, May 04, 2006

'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' हे मनात ठेवून एकदम जोशात मी ब्लॉग लिहायला सुरवात केली पण आता ब्लॉग लिहित राहणे मात्र कठीण हो़उन बसले आहे. प्रेरणा मिळावी म्हणून marathiblogs.net वरुन काहि ब्लॉग्स follow केले आणि त्या ब्लॉग्सचे अतिशय चांगले लिखाण बघून गारच पडलो. प्रेरणा मिळ्णे तर दूरच, असे वाटायला लागले कि लायकी आहे का माझी लेखनाची. आरंभशूरपणा तर दाखवला, आता लिहा. नंतर वाटले कि हा माझा ब्लॉग आहे, जो मी माझ्या समाधानासाठी सुरु केला, मग मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार का करावा, कधीतरी मी हि चांगला लेखक बनेल.
प्रेरणा, भावना, कल्पना अशा सगळ्या येतील कधीनकधी माझ्याकडे (काय विचार करताय? मुलींबद्दल नाही बोलतय मी, तशा आल्यातर वाईट नाहि वाटणार मला). त्या आल्याकि कसा झकास ब्लॉग लिहिन मी.
सोडा, नाहि तो हातातला कप नका सोडू, सध्या हा ब्लॉग वाचण सोडा आणि जोपर्यंत मी कल्पना, भावना, प्रेरणा यांना जमवून नवीन ब्लॉग लिहतो तोपर्यंत दुसरा एखादा झकास मराठी ब्लॉग वाचा.