Thursday, November 30, 2006

पुन्हा एकदा लिहावस वाटतय पण लिहायला विषय सापडत नाहीय, मनात सांगायला बरच काही आहे पण सांगायला शब्दच सापडत नाहीय. ही अशी माझी अवस्था आहे, बोला काय करु?
तुम्ही तरी काय सांगणार म्हणा? इकडे कार्यालयातील reports आणि presentations लिहता लिहता, स्वत:साठी अनुदीनी लिहणे राहुन जाते. मन मोकळ करायच ठरवल, तरी आमच्या मात्रुभाषेतले शब्दच आठवत नाहीत. मनात आज ठरवल की लेखन माझ्या अवाक्यातली गोष्ट नसेल, नसली तर नसु दे, काहीही लिहु, अगदी बिनबुडाच आणि बिन structureच (परत एकदा मराठी शब्द आठवायचा अयशस्वी प्रयत्न) लिह पण लिहु, मजेच गोष्ट म्हणजे सगळ सोडून या माझ्या भरकटण्या विषयीच लिहतोय. अस वाटत काय तरी जादू व्हाही आणि मी पुलंच्या सारखा लेख लिहावा, छे! कदाचित देवही तेवढी जादू करु शकणार नाही.
चला जाउद्या पुन्हा कधीतरी भेटु, नाहीतर माझे हे आताचे बरळणे काही थांबायचे नाही.

Monday, September 04, 2006

बापरे! किती काय काय करायचय?

जवळ जवळ दोन महिने झाले असतील काहि लिहले नाही. बरेच दिवस झाले लिहिन लिहिन म्हणत होतो पण राहिलच. तसा तीन-चारदा लिहायचा प्रयत्न केला आणि अर्धवट काहीतरी लिहलही पण आवडले नाहीत म्हणून ते लेख पूर्णच केले नाहीत.
मी तसा आरामात काम करणारा आणि आरामात असूनही व्यवस्थित काम करणारा, पण गेल्या वर्षापासून किंवा विशेषत: गेल्या काही महिन्यांपासून इतक काय काय करायचय की वेळच पुरत नाहीय. माझ्या कार्यालयातल्या काम आणि जबाबदार्‍या वाढत चालल्यात आणि मी त्या कामामुळे माझ्या जीवनातला इतर वेळ वापरायला अजिबात तयार नाहीय. Balanaced life का काय ते म्हणतात ना तस काहीतरी हवय मला. मला अस कधीच वाटल नव्हत की मी देवाकडे दिवसात जास्त वेळ असावा अस कधी मागेन, पण आता अस वाटतय की एका दिवसात चोवीस नव्हे तर कमीत कमी छ्त्तीस तास तरी असावेत. अर्थात कार्यालय मात्र आठच तासाच असाव. किती काय काय करायच आहे; कार्यालयाच्या कामात (सध्या ते माझ्या आवडीच आहे म्हणून) स्वत:ला झोकुन द्यायच आहे आणि अस काहितरी करायचा आहे की ज्यामुळे पूर्ण जगात माझ नाव होईल; वाचायची आहेत अशा पुस्तकांची यादी तयार झालीय आणि ती वाढतच चाललीय, ती सगळी पुस्तके वाचायची आहेत; रोज घरच्यांबरोबर मनसोक्तपणे गप्पा मारायच्यायत आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवायचाय; रोजच्या रोज मला माझे विचार आणि माझे अनुभव लिहायचेयत; दूरच्या मित्रांशी सतत contact मध्ये रहायचय आणि जवळच्या मित्रांबरोबर बाहेर मस्त हुंदडायचय; मला प्रेम अनुभवायचय; माझी ज्ञानाची भूक मिटवायचीय आणि जितक ज्ञान जमा करता येईल तितक ज्ञान घ्यायचय आणि सर्वात शेवटी आणि महत्वाच म्हणजे मधून मधून या माणसांनी बनवलेल्या concrete च्या जंगलापासून दूर कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी जाउन निसर्ग अनुभवायचाय आणि ताजी हवा खायचीय. मला माहीत नाही हे एवढ सगळ मी कस करणार आहे, मला अगदी पुसटशीही कल्पना नाही पण करायच एवढ मात्र नक्की. माझी अशी खात्री की वरच्या यादीत नक्कीच काही गोष्टी राहुन गेल्यायत, पण जाउदेत आता.
नेहमीप्रमाणे याहि लेखाचा शेवट एका मूर्ख प्रश्नाने करतो. जर या यादीतल्या सगळ्या गोष्टी मी करु शकलो तर माझ्या उर्वरीत आयुष्यात या गोष्टी करत राहण्यात मला मजा येईल का? हे असच सर्व करत रहावस वाटेल का, की माझ्या आवडीनिवडी बदलत राहतील?

Friday, July 14, 2006

माझे spam?

बरेच दिवस झाले, काहि लिहल नाही. कार्यालयात कामाचा व्याप वाढलाय, आणि घरात roommateचे आईवडील आल्याने तो संगणकाचा डब्बा सारखा सारखा चालू करायला मिळत नाही.
असो, हा ब्लॉग लिहायच्या जरा आधी माझ एक e-mail account check करत होतो. पहिले काहि message चे विषय याप्रमाणे,
  • youv'e got job
  • Nikhil, it's time to change you (some job website again)
  • Nikhil, The best Match for U is (obviously matchmaking or modern arranged marraige agent)
  • Nikhil, meet me today (another match maker)
  • Nikhil find the perfect employment

so on and so forth. वा! मी नेहमीप्रमाणे (दररोज) मला मिळणार्‍या या संधी बघुन क्रुतार्थ झालो. जाहिरात करायची पण काही सीमा असते. आज तसा मी थोडा निराशही झालो. नेहमीची ती जाहिरात, hi, I am anju, 22, want to meet you, आज नव्ह्ती. गंमत म्हणजे, जर कोणी एका ५ वर्षाच्या मुलाच्या नावाने कींवा ८० वर्षांच्या आजोबांनी जरी e-mail account उघडल तरी या जाहीराती येतात. (कोण म्हणतय बालविवाहांवर बंदी आहे?). नोकरीच्या जाहीरातीतर अफलातूनच, अगदी कधी चुकुनही नोकरी बदलायचा विचार आलेल्यालाही वाटेल की आपण नोकरी बदलावी.

हे झाल एका विशिष्ट accountबद्द्ल, दुसर्‍या एका accountमध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या US किंवा UK च्या bank account information बद्द्ल mail येत असतात. अर्थात, बहुतेक banksची नावे मी कधी जन्मात ऐकलेलीहि नसतात. जर मी या सगळ्या banks मोजल्या तर मला वाटत की आपल्या नेता लोकांपेक्षाही जास्त bank accounts निघतील.

जशा TVवर मालिकांपेक्षा जाहिराती जास्त करमणूक करतात, तसच आजकाल e-mail accountsवर हळूहळू mailपेक्षा spam जास्त करमणूक करायला लागलाय. (खरतर, TV हा करमणूकी करता असतो यावरुन माझा पूर्ण विश्वासच उडालाय, दोन-तीन channels सोडले तर TV हा torcher करण्याकरता असतो, असे माझे मत आहे.)

आयुष्य आपल्याकडे काय आहे, यापेक्षा सर्व जाहीराती बघुन आपल्याला काय मिळू शकत हे बघतच घालवव लागणार.

Sunday, July 02, 2006

तुलना हि जितकि चांगली गोष्ट आहे, तितकीच वाईटहि आहे. आपल्यापेक्षा superior स्थितित असणाऱ्या लोकांना बघून आपण प्रेरीत होतो, तसेच ते आपल्या असमाधानाचेही कारण बनते. आता उदाहरणच घ्यायच झाल तर माझ किंवा माझ्या मित्रांच घेता येईल. आम्ही एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागलो, सगळ व्यवस्थित चालू होत. पण अचानक त्यांच्या लक्षात आल की आपल्या दुसऱ्या classmatesना आपल्यापेक्षा जास्त चांगले पगार मिळतायत आणि मन विचलित होण चालू झाल.
आपण सतत ऐकत राहतो, की आनंद बाहेर कुठे नाही पण आपल्या मनात असतो, पण प्रत्येक्षात मात्र आपल सुख आपण नेहमी दुसर्‍यांशी तुलना करुन मोजतो. माणूस कितीही आनंदी असला तरी कोणा तरी आपल्यासारख्याकडेच काहितरी जास्त चांगल आहे कळल की त्याचा आनंद दुःखात बदलतो. अर्थात याला अपवाद अशी माणस असतात पण फारच कमी. या तुलनेला कधीही अंत नसतो, अगदी श्रीमंत माणूससुद्धा गरीब माणसाकडे बघून विचार करतो कि त्या गरीब माणसाला रात्री किती शांत झोप लागत असेल, त्याच्या जीवाला धोका नाही, पैस्यांच रक्षण करायची चिंता नाहि, वगैरे वगैरे आणि दुःखी होतो.
याच्या अगदी उलट म्हणजे जोपर्यंत माणसाला अस वाटत नाही की आपल्याकडे काही कमी आहे, तोपर्यंत तो काही काम करणार कसा आणि पुढे जाणार कसा. असे प्रश्न अनुत्तरीत सोडलेलेच बरे असतात.

Monday, June 19, 2006

ह... एकंदर कार्यालयातील वातावरण बघून वाटतय की पुढचा आठवडा फारच धावपळीत जाणार. नाही म्हणजे जरी मी IT companyत कामाला असलो तरी जास्त काम म्हंटल की कपाळाला आठ्या या पडतातच. नोकरी लागली की कस जग थांबूनच जात. Collegeमध्ये असतांना कोणी मित्राने फोन केला की बोलायला हजार गोष्टी असायच्या, आता कोणी विचारल 'क्या चल रहा है?" तर माझ आपल standard उत्तर तयार असत, "कुछ नही यार, बस अपना routine job चल रहा है।" शैक्षणिक आयुष्यात जो उत्साह असतो तो एकदा नोकरी चालू झाल्यावर कसा संपूनच जातो. नाहि म्हणायला नोकरीमध्ये पण शिकण्यासारख फार काही असत पण त्या शिकण्यात तशी फारशी मजा येत नाही, अर्थात अस सगळ्यांच्याच बाबतीत होत नसाव. हे माझ्या मनात आल ते म्हणजे आजकाल माझ्या मित्रांचे माझ्याबरोबर जे संवाद होतात त्यामुळे. तो पहिलेचा सहजपणा कसा तो उरलाच नाहीय. बहुतेक संवाद काम, पैसा, career आणि लग्न (वयाचा दोष) या चार गोष्टींभवतीच फिरत राहतात. लग्न हा विषय तसा नुकताच काही महिन्यांपूर्वी आमच्या संवादामध्ये यायला लागला; सर्वथा नवीन हो‍उ घातलेल्या नवरेमंडळींमुळे. सर्वच संवाद तसे गंभीर नसतात; कार्यालयातील निरनिराळ्या मजा, एकाकाचे कार्यालयातील कारनामे ऐकण्याजोगे असतात. आयुष्य कधी आणि कस बदलत हे लक्षात येत नाही. शाळेत असतांना किंवा college मध्ये असतांना अस सतत वाटत रहायच की आयुष्यात काहीतरी नवीन होतय. याउलट गेल्या एक वर्षापासून अस वाटतय की आयुष्य एकाच ठिकाणी थांबलय आणि पुढे सरकायला तयारच नाहीय. सुट्टीच महत्व शाळेपेक्षा नोकरीत जास्त कळत. अल्बर्ट आइनस्टाइनचा एक सुंदर quote आहे, “Life is like riding a bicycle, to keep it balanced you need to keep moving.” आणि माझ्या cycleचा balance जायला लागलाय.
चला जाउद्या थोड काम करायला पाहिजे नाहितर आमची cycle चालणार कशी?

Wednesday, June 07, 2006

भविष्याचा आणि स्वप्नांचा वेध

माणूस सतत भविष्याचा वेध घेत असतो; कधी planning करुन तर कधी ज्योतिष्याच्या मागे लागुन. क्वचितच कोणी एखादा सापडतो, जो पुढे काय होईल असा विचार करत नाहि. प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपर्‍यात काही स्वप्ने दडून बसलेली असतात आणि प्रत्येकजण भविष्यात हि स्वप्ने शोधायचा प्रयत्न करत असतो. मग माणूस हि स्वप्न पूर्ण करायच्या मागे लागतो आणि फार कमी लोक त्यात यशस्वी होतात. अर्थात सर्वच स्वप्नांच्या मागे लागतात असेहि नाहि, मात्र जे मागे लागतात त्याच्या तर्‍हा निरनिराळ्या असतात. इकडे मागे लागतात याचा अर्थ, स्वप्न पूर्ण होतील अशी आशा बाळगून राहतात.
काही लोक ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ म्हणत, फक़्त स्वप्नच बघतात आणि आपले आयुष्य आहे तसेच चालु ठेवतात, काहिहि प्रयत्न करत नाहित. काहि रात्रंदिवस आपली स्वप्न खरी करण्याच्या दिशेने झटतात. काहि प्रयत्न करतात पण स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने नाही तर स्वप्न पूर्ण होतील का आणि झाली तर कधी पूर्ण होतील हे शोधण्याच्या द्रुष्टीने. ज्योतिष्याच्या मागे लागणार्‍या लोकांमध्ये या लोकांचे प्रमाण जास्त असत. स्वप्न पडो वा न पडो, भविष्य जाणून घेण्याची इच्छा मात्र जवळ जवळ सर्वांनाच असते.
भविष्य जाणण्यासाठी विचारले जाणारे प्रश्न पण फार भारी असतात. कोणी विचारतो मला lottery कधी लागेल, तर कोणी विचारतो मला नोकरी कधी लागेल किंवा बढती कधी मिळेल? of course, हाच प्रश्न आजकालचे IT वाले लोक, मी switch कधी मारणार असा वेगळ्या प्रकारे विचारतात (non-IT लोकासाठी, swith मारण्त म्हणजे नवीन companyत नोकरी लागणे किंवा जुन्या companyत आताच्या companyपेक्षा जास्त पगारावर नोकरी लागणे). तरुण पोरींचे पालक हमखास विचारणार की त्यांच्या मुलीच लग्न कधी होणार? अगदी राजकारणीसुद्धा त्यांच्या त्यांच्या पदाप्रमाणे विचारतात की ते मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री कधी होणार वगैरे वगैरे. गरीब असो वा श्रीमंत आपली स्वप्ने पूर्ण होणार की नाही याची उत्सुकता सर्वांनाच असते.
असो सध्या मला ज्योतिषाला एकच प्रश्न विचारायचाय की एकता कपूर नावाच्या एका समाजकंटकीच्या मालिका कधी बंद होणार; माझा roommate या सर्व मालिका बघून मला torture करतोय.

Friday, May 26, 2006

लग्नांचा हंगाम

लग्नांचा हंगाम तसा दरवर्षीच येतो, पण या वर्षीचा हंगाम माझ्याकरता जरा वेगळाच कारण अचानक या वर्षीच्या हंगामात बराचसा माझा मित्रपरीवार लग्नाच्या सुंदर (?) बेडीत अडकणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच एका मित्राच्या लग्नाला हजेरी देउन आलो, त्याचवेळी एकाचा साखरपुडा झाला; एकाचा दोन दिवसाने साखरपुडा आहे, आणि एक घरी मुलगी बघायला गेलाय. हा मुलगी किंवा मुलगा (जरी या प्रकाराला मुलगी बघणे म्हणत असले तरी मुली काही आंधळ्या नसतात, त्यांचाही तेवढाच अधिकार असतोच) बघायचा प्रकार जरा गंमतशीरच वाटतो, अर्थात अजून माझ्यावर वेळ आली नाहीय म्हणून; जेव्हा माझ्यावर वेळ येईल तेव्हा माझी काय अवस्था होईल याची मला कल्पनाही करवत नाही. लग्नाची चिंता आईवडीलांपेक्षा आजूबाजूच्या नातेवाईकांनाच जास्त असते. एकदा मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयाचे झाले की मग आयुष्यात पहिले कधीही न बोललेले नातेवाईक सुद्धा विचारतात, “मग काय, कधी करणार लग्न; अरे ती ह्या अमुक अमुकची मुलगी आहे ना, ती तमुक तमुक ठीकाणी नोकरी करते, दिसायला सुंदर आहे हो.” वगैरे वगैरे. नाही म्हंटल की काही आचरट नातेवाईक असेहीचारतात, “का? कोणी आहे वाटत?”. काहि नवीन जमान्याचे नातेवाईक असतात, ते लग्नाबद्दल नाहि विचारत, ते विचारतात, “काय? मग कुणी मुलगी शोधली कि नाही?” (जस काही बराचशा मुली मी propose मारायचीच वाट बघत असतात). मग माझ्यासारखे पामर ज्यांच्याकडे सहसा मुली ढुंकुनसुद्धा बघत नाहित ते बोलणार तरी काय; मग मी वाक्य टाकतो, “नाही, शोधकार्य चालू आहे, I hope, सापडेलच लवकर.” (मी पण अस बोलतो जस काही माझी एखादी मूल्यवान वस्तू हरवलीय आणि मी ती शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय). यातला अजून एक प्रकार म्हणजे काही नातेवाईक indirectly सुरवात करतात, “काय, मग तिकडे एकटाच राहतोस का?, खाण्याचे हाल होत असतील नाही, लग्न का नाही करुन टाकत?”. च्यायला बायको म्हणजे काय स्वयंपाकीण बाई आहे, की चांगल खायला नसेल मिळत तर बायको आणा. या सर्वात मोठा कहर म्हणजे काही मुलही असाच विचार करतात. माझा एका जवळच्या मित्राबरोबर याबाबत एकदा वाद झाला, मी त्याला स्पष्ट विचारल “बाबारे, पहिल्यांदी नक्की ठरव की तुला cook पाहीजे की बायको?” शेवटी त्यानेसुद्धा त्याच्या बोलण्यातला फोलपणा मान्य केला. एकंदर लग्न म्हणजे फारच किचकट प्रकार असतो, पण म्हणतात ‘शादी का लड्डू जो खाये वो भी पछ्ताये, जो न खाये वो भी पछताये’. आम्हीपण हा लाडू कधीतरी खाउच.
असो, सध्यातरी माझ्यापुढे प्रश्न हा आहे, की एवढ्या सगळ्या लग्नांसाठी मी सुट्टी कशी काढू. सगळे अगदी जवळचे मित्र असल्यामुळे कोणाला नाही म्हणणे जवळ जवळ अशक्य आहे. माझ मित्रमंडळ म्हणजे नवीन नवरे आणि हो‍उ घातलेले नवरे अगदी खुशीत आहेत, ज्यांना नवीन जबाबदार्‍यांच tension आलय ते ही आनंदात आहेत.

Tuesday, May 16, 2006

विचारांच्या भ्रमंतीत

काहि लोक बोलून मग विचार करतात तर काहि विचार करतात आणि मग बोलतात. मी फार विचार करुन फार कमी बोलणार्‍या लोकांमधला. या सवयीचे जसे फायदे आहेत तसे तोटेहि भरपूर आहेत. कोणि काही अचानकपणे मला अनपेक्षित प्रश्‍न विचारला तर फारच गोची होते. मग अचानक मी हुशार निखील मधून मठ्ठ निखील मध्ये परीवर्तीत होतो. आज असाच एक प्रसंग झाला, मी माझ्या कार्यालयातील एका सहकारी बरोबर कार्यालयातील काही कामाबद्‍दल बोलत होतो आणि माझ्या संगणकावरील ब्लॉगरची window बघून तीने मी ब्लॉग लिहतो का अस विचारल. आता हा साधा, सरळ, सोप्पा प्रश्‍न, पण मी दोन मिनिट काहि बोलूच शकलो नाही; त्यानंतर हळूच हो म्हंटले. तीने प्रश्‍न विचारल्याबरोबर माझे विचार सुरु झाले, माझ्या इंग्रजी ब्लॉगवर मी माझ्या कार्यालयातील लोकांबद्‍दल बरच काही लिहलय, ते मी share करु शकतो का? मग मी कार्यालयाबद्‍दल काय काय लिहलय? वगैरे वगैरे. (ती अमराठी त्यामुळे तिच्याशी इंग्रजी ब्लॉगच share करावा लागणार.) एवढया सगळ्या विचारात तीने माझ्या ब्लॉगची link विचारली आणि मी काहि ती दिली नाही.
विचारांच्या भ्रमंतीत माझ्यासारखी माणस कधी हरवतात ते त्यांच त्यांनाच कळत नाही. मला कधी कधी फार अप्रूप वाटत की बाकी सगळे विचार आणि बोलण यांचा मेळ कसा साधतात. हि एक गोष्ट मला शिकायची आहे. विचारांची हि देवाने दिलेली देणगी मला लाभलीय खरी पण तिचा व्यवस्थितपणे वापर करावा हे मात्र पूर्णपणे उमगलेले नाही, आणि मलाच नाही तर बर्‍याच लोकांना ही गोष्ट उमगत नाही.

Thursday, May 11, 2006

माझ मराठी वाचन

दोन दिवसांपूर्वी मी सहजच मराठी ब्लॉगविश्वाला भेट दिली आणि माझ्या ब्लॉगचे नाव मराठी ब्लॉगश्रुंखलेत बघून एक सुखद धक्काच बसला. खरतर मी माझा ब्लॉग नोंदवण्यासाठि त्या संकेतस्थळाला भेट दिली होती. मला मराठी ब्लॉगविश्वाचे या तत्परतेकरता आभार मानायलाच हवेत. आता मलासुद्धा नियमितपणे ब्लॉग लिहित राहण्याचा निर्धार करायला हवा.
हा होता पहिला धक्का आणि आज परत संकेतस्थळाला भेट दिल्यावर दुसरा धक्का बसला, तो म्हणजे winiने मला दिलेला tag, ह्या धक्क्यातन सावरण थोड कठिणच आहे. तसा मी वाचनप्रिय मनुष्य पण गेल्या बर्‍याच वर्षात मराठी पुस्तकांशी काहि संबंध असा आलाच नाही, त्यामुळे फारच आठवून आठवून उत्तर द्‍यावी लागणार. एकदा ते दहावीपासून त्या दुष्ट अभ्यासाने आणि करीयरच्या tension ने जो पिच्छा पुरवला तो अगदी मागच्यावर्षीपर्यंत, अर्थात करीयरचे tension अजून आहेच. नोकरी करतोय ती पण महाराष्ट्राबाहेर, ते हि R&D वाली त्यामुळे कामाविषयी पुस्तके वाचण जास्त. इथे मराठी मित्रांचा अभाव आणि आजुबाजुचा प्रभाव ह्यामुळे इंग्रजी पुस्तके मात्र बरीच वाचली, इकदे खरतर मराठी बोलायला मिळ्णच भाग्यकारी.
आता नखरे सोडुन उत्तर द्‍यायला सुरवात करतो. (म्या पामराची काय अवस्था होतेय ते सांगण कठीण आहे, इतक्या वर्षांनंतर पुस्तकांची आणि त्यांच्या लेखकाची नाव आठवायची म्हण्जे, माझी अवस्था गल्लीतल्या पोराला ब्रेट ली ची बॉलिंग खेळायला लावल्यावर जशी व्हावी तशी होत आहे.)
१. सध्या वाचनात असलेले / शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
पार्टनर - व. पु. काळे

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
एका सामान्य माणसाचे जीवन आणि त्यात त्याच्या आयुष्य enjoy करणार्‍या roommate ची कहाणी. (यापेक्षा काही जास्त लिहायच तर मला माझ्या जवळ जवळ नसलेल्या memoryवर जरा जास्तच जोर द्‍यावा लागेल)

३. अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -
असा मी असा मी – पु. ल. देशपांडे
ती फुलराणी - पु. ल. देशपांडे
छावा – शिवाजी सावंत
श्रीमान योगी – रणजित देसाई
स्वामी – रणजित देसाई

४. अद्‍याप वाचायची आहेत अशी ५ मराठी पुस्तके -
युगंधर - शिवाजी सावंत
म्रुत्युंजय - शिवाजी सावंत
आचार्य अत्रे आणि रत्‍नाकर मतकरी यांची सर्व


५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
स्वामी - रणजित देसाई
माधवराव पेशवे यांच्यावर लहानपणातच पडलेली प्रचंड जबाबदारी आणि ऐन तारुण्यातच म्रुत्युची घरघर व त्यातच एवढी वर्षे इंग्रजाना दूर ठेवण्यात आलेल यश गमावून बसण्याची शक्यता; या सर्वांच उत्क्रुष्ट चित्रण म्हणजे हे पुस्तक. माधवराव पेशव्यांच धैर्य आणि शेवटी आपले काकाच आपले शत्रु बनत असल्याच दु:ख, अशा सर्व भावना रणजित देसाई यांनी अत्यंत सुंदरपणे आपल्या लेखनात उतरवल्यात.
Its inspirational to say the least.

Thursday, May 04, 2006

'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' हे मनात ठेवून एकदम जोशात मी ब्लॉग लिहायला सुरवात केली पण आता ब्लॉग लिहित राहणे मात्र कठीण हो़उन बसले आहे. प्रेरणा मिळावी म्हणून marathiblogs.net वरुन काहि ब्लॉग्स follow केले आणि त्या ब्लॉग्सचे अतिशय चांगले लिखाण बघून गारच पडलो. प्रेरणा मिळ्णे तर दूरच, असे वाटायला लागले कि लायकी आहे का माझी लेखनाची. आरंभशूरपणा तर दाखवला, आता लिहा. नंतर वाटले कि हा माझा ब्लॉग आहे, जो मी माझ्या समाधानासाठी सुरु केला, मग मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार का करावा, कधीतरी मी हि चांगला लेखक बनेल.
प्रेरणा, भावना, कल्पना अशा सगळ्या येतील कधीनकधी माझ्याकडे (काय विचार करताय? मुलींबद्दल नाही बोलतय मी, तशा आल्यातर वाईट नाहि वाटणार मला). त्या आल्याकि कसा झकास ब्लॉग लिहिन मी.
सोडा, नाहि तो हातातला कप नका सोडू, सध्या हा ब्लॉग वाचण सोडा आणि जोपर्यंत मी कल्पना, भावना, प्रेरणा यांना जमवून नवीन ब्लॉग लिहतो तोपर्यंत दुसरा एखादा झकास मराठी ब्लॉग वाचा.

Wednesday, April 26, 2006

लेखन आणि मी...

आजकाल मी फारच बेकार मूडमध्ये आहे. बराच वेळ विचार करुनहि काहि चांगले लिहायला जमत नाहिय. Of course, एकदम चांगल लिहायला मी काही लेखक नाहि किंवा कवीही नाहि. मी एक अत्यंत शांत व कमी बोलणारा असा माणूस आहे, त्यामुळे असेल कदाचित पण मला लिहायला आवडत.
लिहण्याने काही एक वेगळच समाधान मिळत. त्यामुळे जे मनात येईल ते लिहित सुटतो. आणि जेव्हा मला लहानपणीचा मी आठवतो तेव्हा मला फारच नवल वाटत की अचानक मला अशी लिहायची गोडी कशी लागली. तेव्हा कधी स्वप्नातसुद्धा वाटल नसेल की मला लिहण्याचा छंद जडेल.
मनातल्या भावना अशा लिहून समोर आल्या कि स्वतःच्या वेडेपणाच स्वतःलाच हसू येत आणि नंतर लक्षात येत कि या वेडेपणातच माझ मीपण लपलय. माझा हा लेखनाचा छंद हळूहळू मीच माझ्या अंतर्मनाचा शोध घेण्याचा एक प्रयत्न होत चाललाय.
अजून मराठी भराभर type करायची सवय होत नाहिय, त्यामुळे या चार-पाचच ओळी लिहता लिहता माझी वाट लागतेय. आता एवढ्यावरच संपवतो.

Thursday, April 20, 2006

पहिला post

बरेच दिवस विचार करत होतो कि मराठीतून काहितरी लिहिन म्हणून, आज सुरवात करतो आहे. दहावीनंतर पहिल्यांदाच मराठीतून लिहित असेन. मराठीतून type करण फार कठीण जात आहे, सवय होईल हळू हळू.
हा ब्लॉग म्हणजे माझ्य़ा मराठीची एक परीक्षाच आहे. गेल्या तीन-चार वर्षात फारच कमी मराठी बोलतो आहे. घरी असेन तेव्हा नाहितर घरी फोन करेन तेव्हा, त्याशिवाय फारच कमी. प्रयत्न तर सुरु केले आहेत, पुढे बघू काय होते ते.