Friday, May 26, 2006

लग्नांचा हंगाम

लग्नांचा हंगाम तसा दरवर्षीच येतो, पण या वर्षीचा हंगाम माझ्याकरता जरा वेगळाच कारण अचानक या वर्षीच्या हंगामात बराचसा माझा मित्रपरीवार लग्नाच्या सुंदर (?) बेडीत अडकणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच एका मित्राच्या लग्नाला हजेरी देउन आलो, त्याचवेळी एकाचा साखरपुडा झाला; एकाचा दोन दिवसाने साखरपुडा आहे, आणि एक घरी मुलगी बघायला गेलाय. हा मुलगी किंवा मुलगा (जरी या प्रकाराला मुलगी बघणे म्हणत असले तरी मुली काही आंधळ्या नसतात, त्यांचाही तेवढाच अधिकार असतोच) बघायचा प्रकार जरा गंमतशीरच वाटतो, अर्थात अजून माझ्यावर वेळ आली नाहीय म्हणून; जेव्हा माझ्यावर वेळ येईल तेव्हा माझी काय अवस्था होईल याची मला कल्पनाही करवत नाही. लग्नाची चिंता आईवडीलांपेक्षा आजूबाजूच्या नातेवाईकांनाच जास्त असते. एकदा मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयाचे झाले की मग आयुष्यात पहिले कधीही न बोललेले नातेवाईक सुद्धा विचारतात, “मग काय, कधी करणार लग्न; अरे ती ह्या अमुक अमुकची मुलगी आहे ना, ती तमुक तमुक ठीकाणी नोकरी करते, दिसायला सुंदर आहे हो.” वगैरे वगैरे. नाही म्हंटल की काही आचरट नातेवाईक असेहीचारतात, “का? कोणी आहे वाटत?”. काहि नवीन जमान्याचे नातेवाईक असतात, ते लग्नाबद्दल नाहि विचारत, ते विचारतात, “काय? मग कुणी मुलगी शोधली कि नाही?” (जस काही बराचशा मुली मी propose मारायचीच वाट बघत असतात). मग माझ्यासारखे पामर ज्यांच्याकडे सहसा मुली ढुंकुनसुद्धा बघत नाहित ते बोलणार तरी काय; मग मी वाक्य टाकतो, “नाही, शोधकार्य चालू आहे, I hope, सापडेलच लवकर.” (मी पण अस बोलतो जस काही माझी एखादी मूल्यवान वस्तू हरवलीय आणि मी ती शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय). यातला अजून एक प्रकार म्हणजे काही नातेवाईक indirectly सुरवात करतात, “काय, मग तिकडे एकटाच राहतोस का?, खाण्याचे हाल होत असतील नाही, लग्न का नाही करुन टाकत?”. च्यायला बायको म्हणजे काय स्वयंपाकीण बाई आहे, की चांगल खायला नसेल मिळत तर बायको आणा. या सर्वात मोठा कहर म्हणजे काही मुलही असाच विचार करतात. माझा एका जवळच्या मित्राबरोबर याबाबत एकदा वाद झाला, मी त्याला स्पष्ट विचारल “बाबारे, पहिल्यांदी नक्की ठरव की तुला cook पाहीजे की बायको?” शेवटी त्यानेसुद्धा त्याच्या बोलण्यातला फोलपणा मान्य केला. एकंदर लग्न म्हणजे फारच किचकट प्रकार असतो, पण म्हणतात ‘शादी का लड्डू जो खाये वो भी पछ्ताये, जो न खाये वो भी पछताये’. आम्हीपण हा लाडू कधीतरी खाउच.
असो, सध्यातरी माझ्यापुढे प्रश्न हा आहे, की एवढ्या सगळ्या लग्नांसाठी मी सुट्टी कशी काढू. सगळे अगदी जवळचे मित्र असल्यामुळे कोणाला नाही म्हणणे जवळ जवळ अशक्य आहे. माझ मित्रमंडळ म्हणजे नवीन नवरे आणि हो‍उ घातलेले नवरे अगदी खुशीत आहेत, ज्यांना नवीन जबाबदार्‍यांच tension आलय ते ही आनंदात आहेत.

No comments: