Sunday, January 27, 2008

विसरलो मी मला,
शोधू कुठे मी मला,
होतो मी सदैव हसरा, आयुष्याची लढाई नेटाने लढणारा. कधी खिन्न होउन तर कधी आनंदाने, पण नेहमीच सुंदर स्वप्ने बाळगणारा, स्वप्ने कधी ना कधी खरी होतील अशी वेडी आशा बाळगणारा. आत्मविश्वासाची कधीच काही कमी नव्हती, फक्त संधी मिळायची वाट होती. स्वत:चेच नाही तर दुसर्‍यांचेही आयुष्य सुखी करायची इच्छा होती. संधी आली, वाटले की आपणही का इतरांप्रमाणे त्याच त्याच रगाड्यात फसावे, तडजोड कशी ती जमलीच नाही. पण प्रत्येक गोष्टीची कींमत असते, इतरांशी लढुन लढुन दमछाक झाली. सुंदर स्वप्ने बघणारे मन दिवसाढवळ्या वाईट स्वप्नांचा शिखर चढू लागले. सुंदर स्वप्न आलेच तर त्याची परीस्थितीशी तुलना करुन त्याची खिल्ली उडवायला लागले. नेहमीच वाट ठाउक असलेला मी, हरवून गेलो. भव्य सागराच्या मध्यभागी उभेच राहता येइल इतक्या छोट्या बेटावर अडकुन पडलो. स्वत:च्याय प्रश्नांचा विचार करण्यात इतका गुंतून गेलो की दुसर्‍यांचेही आयुष्य सुखी करायची जबाबदारी आपण घेतली होती हे विसरुन गेलो. आताही मी हसतो, पण त्या हसण्यात क्वचितच आनंद असतो. आता मी सदैवच खिन्न असतो, पण आजही मधून मधून त्या भव्य सागरात पोहुन जमीनीवर जाण्याची योजना करु लागतो. माझ्या मनाशी मी एवढेच मागतो की काही झाले तरी ही आशा मात्र सोडू नको.
आज परत आयुष्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, तडजोड करावी की नाही अशा संभ्रमात पडलेला.

No comments: